शेतकऱ्यांसाठी महावितरणने सव्वादोन महिन्यांत तब्बल २८ हजारांवर नादुरुस्त रोहीत्र बदलले

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचे नादुरुस्त झालेले वितरण रोहीत्र तात्काळ बदलून देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची महावितरणने चोख अंमलबजावणी करीत गेल्या सव्वादोन महिन्यांमध्ये राज्यभरात तब्बल २८ हजार ४३० नादुरुस्त रोहीत्र बदलण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सद्यस्थितीत गेल्या दोन दिवसांमध्ये नादुरुस्त झालेले ३३९ रोहित्र देखील तात्काळ बदलण्यात येत आहेत. नादुरुस्त झालेले रोहित्र तात्काळ बदलून मिळत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी यंदा राज्य शासनाकडून मोठे पाठबळ मिळाले आहे.

रब्बीच्या हंगामात शेतपिकांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वितरण रोहित्र ताबडतोब बदलण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला दिले. त्याप्रमाणे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी विविध बैठकींद्वारे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना नादुरुस्त रोहित्र तात्काळ बदलण्याची सक्त सूचना केली. तसेच रोहीत्र दुरुस्तीच्या प्रक्रियेला व ऑईलच्या उपलब्धतेला वेग दिला. यासह महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी राज्यभर दौरे करून आढावा घेत सर्व परिमंडलामध्ये नादुरुस्त रोहीत्र बदलण्याच्या कार्यवाहीला आणखी वेग दिला. याची फलनिष्पती म्हणून यंदा महावितरणने आजवरची ऐतिहासिक कामगिरी केली आहे व गेल्या डिसेंबरमध्ये १७ हजार ७८५, जानेवारीमध्ये ८ हजार ४०४ व ८ फेब्रुवारीपर्यंत २ हजार २४१ असे एकूण २८ हजार ४३० नादुरुस्त रोहित्र केवळ दोन ते तीन दिवसांच्या कालावधीत बदलले आहेत.

राज्यात कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे महावितरणचे एकूण ७ लाख ५४ हजार वितरण रोहीत्र आहेत. विशेष म्हणजे नादुरुस्त रोहित्र बदलण्याच्या मोहिमेमुळे गेल्या सव्वा दोन महिन्यांमध्ये नादुरुस्त रोहित्रांचे प्रतिदिवस प्रमाण केवळ ३२० ते ३२५ वर आले आहे. यापूर्वी विविध कारणांमुळे राज्यात दररोज सुमारे ३ हजार ते ३ हजार ५०० रोहित्र बदलणे शिल्लक राहत असल्याची स्थिती होती. सद्यस्थितीत महावितरणकडे ऑईलसह सुस्थितीतील ४ हजार ३१२ रोहित्र उपलब्ध आहेत. तर राज्यात विविध ठिकाणी १९३४ कंत्रांटदार एजन्सीकडे आणखी ११ हजार ६५६ रोहित्रांची दुरुस्ती वेगाने सुरु आहे.

गेल्या सव्वादोन महिन्यांमध्ये नादुरुस्त झालेले २८ हजार ४३० रोहित्र बदलण्यात आले त्यामध्ये औरंगाबाद परिमंडल- १८७४, लातूर- ३५४८, नांदेड- २८९३, अकोला- ३४३९, अमरावती- १८७३, नागपूर- २०३, गोंदिया- ६२१, चंद्रपूर- ४६०, बारामती- ४०८६, कोल्हापूर- १४१४, पुणे- ५८६, जळगाव- २४०३, नाशिक- ४७१९, कल्याण- ९८, कोकण-१७५ आणि भांडूप परिमंडलातील ३८ रोहित्रांचा समावेश आहे.

नादुरुस्त झालेले रोहीत्र बदलण्यासाठी नवीन रोहित्राची वाहतूक व बदलण्याची कार्यवाही याची संपूर्ण जबाबदारी ही महावितरणची आहे. त्यामुळे शेतकरी बांधव किंवा संबंधित वीजग्राहकांना त्यासाठी कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च करण्याची गरज नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वितरण रोहित्र नादुरुस्त झाले असेल त्यासंबंधीची माहिती शेतकरी बांधवांनी महावितरणच्या संबंधित कार्यालयात किंवा चोवीस तास सुरु असलेल्या १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.