शिरूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन

पुणे : भाजपचे (BJP) जेष्ठ्य नेते, माजी आमदार बाबुराव पाचर्णे (Baburao Pacharne) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. शिरुर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचं निधन झालं आहे. शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात पाचर्णे यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

आज (गुरुवार) दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी ४ वाजता तर्डोबाचीवाडी येथील शिवतारा कृषि पर्यटन येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. (Bjp MLA Baburao Pacharne passed away)दोनच दिवसांपूर्वी पाचर्णे यांची प्रकृती खालावल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी रात्री उशिरा त्यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत डॉक्टरांकडून तब्येती माहिती घेतली होती.

२०१९ च्या विधानसभा निवडणूकीदरम्यानच पाचर्णे यांच्या प्रकृतीविषयी कुरबूरी सुरू झाल्या होत्या. त्या निवडणुकीतील पराभवानंतर ते राजकारणातून काहीसे अलिप्त झाले होते. दीड वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले. पुण्यातील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. यादरम्यान, त्यांच्या प्रकृतीत अनेकदा चढउतार झाले. परंतू दीड वर्षांच्या या कालावधीत कर्करोगाने ग्रासल्याने त्यांचे इतर अवयवही निकामी होत गेले आणि आज अखेर येथील खासगी रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.