माजी आमदार प्रकाश देवळे पुन्हा एकदा चित्रपट दिग्दर्शनाकडे

Mumbai – माजी आमदार प्रकाश देवळे (MLA Prakash Devle) पुन्हा एकदा चित्रपट दिग्दर्शनाकडे वळले आहेत. त्यांच्या आगामी ‘अनटोल्ड स्टोरी: मिशन इंडिया’ या हिंदी चित्रपटातून आता एका रणरागिणीची गोष्ट रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. स्वत:च्या कुंकवाचे देशासाठी बलिदान देणाऱ्या आणि त्याचा प्रतिशोध घेणाऱ्या एका बहादूर रणरागिणीची गोष्ट चित्रपटात पाहता येणार आहे.

प्रकाश देवळे, सपना लालचंदानी यांच्या डेस्टिनी प्रॉडक्शन निर्मित ‘अनटोल्ड स्टोरी: मिशन इंडिया’ या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच शिरगाव येथील प्रति शिर्डी साई मंदिर येथे संपन्न झाला. प्रकाश देवळे यांनी या पूर्वी मायेची सावली हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. आता एक अनोखी कथा  ‘अनटोल्ड स्टोरी: मिशन इंडिया’ या चित्रटातून ते मांडणार आहेत. चित्रपटाची कथा प्रकाश देवळे यांचीच आहे. तर प्रकाश देवळे, सपना लालचंदानी, आबा गायकवाड यांनी पटकथा, संवादलेखन केलं आहे. प्रकाश देवळे दिग्दर्शनाची जबाबदारी निभावत आहेत. स्वरूप स्टुडिओजचे सचिन नारकर आणि विकास पवार या चित्रपटासाठी लाईन प्रोड्युसर म्हणून काम पाहणार आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात काश्मीर येथे या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार असून कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.