रेल्वे मंत्रालयात चार लाख डॉलरची लाच ;सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी – राष्ट्रवादी

मुंबई – ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असं घोषवाक्य घेत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या रेल्वे मंत्रालयात (Railway Ministry) कंत्राट मिळवण्यासाठी चार लाख डॉलरची लाच ओरायकल कंपनीने दिल्याप्रकरणी २३ मिलियन डॉलरचा दंड युनायटेड स्टेट्स सिक्युरिटी ॲंड एक्स्चेंज कमिशनने कंपनीला ठोठावला असून याप्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशात सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांच्याच राजवटीत ओरायकल कंपनीच्या माध्यमातून भारतीय रेल्वे अंतर्गत कंत्राट मिळण्यासाठी जवळपास चार लाख डॉलरची लाच (Four lakh dollar bribe) देण्यात आली याचा खुलासा झाला असून जेव्हा हा भ्रष्टाचार झाला त्यावेळी रेल्वे मंत्रालय पियुष गोयल यांच्याकडे होते. मात्र एवढ्या मोठ्या भ्रष्टाचारावर रेल्वे मंत्रालयाने किंवा भारत सरकारने अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही त्यामुळे या चार लाख डॉलरचा भ्रष्टाचार करुन ज्यांनी कंत्राट दिले त्यांची चौकशी करुन जनतेसमोर उभे केले पाहिजे अशी मागणीही महेश तपासे यांनी यावेळी केली. दरम्यान या भ्रष्टाचारासंदर्भातील भूमिका पियुष गोयल यांनी स्पष्ट करावी अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.