नारायण राणेंच्या सुरक्षेत आणखी वाढ, केंद्राकडून आता थेट Z दर्जाची सुरक्षा

मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून आता त्यांना Z दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. याआधी राणे यांना Y दर्जाची सुरक्षा दिली जात होती. या नव्या सुरक्षेमुळे राणे यांच्या सुरक्षेत सीआयएसएफच्या आणखी 6 कमांडोंचा समावेश करण्यात आला आहे.

सीआईएसएफचे डीआईजी आणि मुख्य प्रवक्ता डॉ. अनिल पांडेय यांनी नारायण राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘Z’ श्रेणीच्या सुरक्षेअंतर्गत नारायण राणे यांच्या भारतातील कोणत्याही दौऱ्यावेळी सहा ते सात सशस्त्र कमांडो उपस्थित राहतील.

नारायण राणे यांना आधीपासून CISF कडून ‘Y+’ सुरक्षा देण्यात येतेय. आता शनिवारपासून नारायण राणे यांचं सुरक्षा कवच अधिक भक्कम होणार आहे.  त्यांना ‘Z’ श्रेणीची सुरक्षा देण्यात येणार आहे. राणेंना गृह सुरक्षा कवचही असेल.राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींना सीआयएसएफची व्हीआयपी सुरक्षा देण्यात आली आहे.दरम्यान, नारायण राणे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.

शिवसेना विरुद्ध राणे हा संघर्ष सातत्याने उफाळून येत असतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राणे यांच्यावर थेट अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्याच दरम्यान, राणे यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी उग्र निदर्शने केली होती. या सगळ्या घटना लक्षात घेता राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे बोलले जात आहे.