सेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाल्याने मनसेच्या गजानन काळे यांची होणार इच्छा पूर्ण

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांच्या गटातील सेनेला आज मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टात आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात दसरा मेळाव्यासाठी नेमकी कुणाला परवानगी मिळावी या मुद्द्या संबंधित याचिकांवर सुनावणी झाली. या सुनावणीत मुंबई महापालिकेचे वकील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) गटाचे आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) यांचे वकील आणि ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई (Anil Desai) यांच्या वकिलांनी आपापल्या पक्षकारांची भूमिका मांडली. तीनही पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने शिंदे गटाची मध्यस्थी याचिका फेटाळली.

कोर्टाने सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची हमी घेण्याच्या अटीवरुन उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाने ही लढाई जिंकली. उद्धव ठाकरे यांच्या गटाला परवानगी मिळाल्यानंतर शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाईल, अशा चर्चांना उधाण आलंय. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी देखील याबाबतची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान मनसेचे नेते गजानन काळे (Gajanan kale ) यांनी काही दिवसांपूर्वी एक खोचक मागणी तसेच इच्छा व्यक्त केली होती. “मुंबई मनपा आणि राज्य सरकारने शिल्लकसेनेला शिवतीर्थावर ‘टोमणे मेळावा’साठी परवानगी देवून टाकावी. खंजीर, मर्द, मावळा, वाघनखं, गद्दार, निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये. तसंही यावेळची स्क्रिप्ट बारामती वरूनच येणार आहे. अबू आझमी आणि असदुद्दीन ओवेसी स्टेजवर असणार आहेत का?”, असं गजानन काळे म्हणाले होते. योगायोगाने न्यायालयाच्या निकालामुळे ती इच्छा किंवा मागणी पूर्ण झाली आहे असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही.