‘दुसऱ्यांच्या भेटी या फक्त राजकीय खलबतांसाठी असतात; आमच्या भेटी या विकास काम आणि शुद्ध हेतू ठेवून असतात’

मुंबई –  केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील (MVA) नेत्यांच्या विरोधात कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narenara Modi ) यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये संसदेतील पंतप्रधान कार्यालयात भेट झाली आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणि भाजप, केंद्रीय तपास यंत्रणा यांच्यात संघर्ष सुरू आहे.  यातच झालेल्या या भेटीमुळे राज्यासहित दिल्लीतील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १२.३० च्या सुमारास पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये २० ते २५ मिनिटं चर्चा सुरु होती. या भेटीत फक्त दोन्ही नेते उपस्थित असल्याचं समजत आहे. पण यावेळी नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण यावेळी राजकीय चर्चाही झाल्याची शक्यता आहे.

दरम्यान, या भेटीची मनसेचे (MNS) नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले, ही भेट महाराष्ट्राचं भलं होण्यासाठी घेतली आहे… यात कोणी ही दुसरा हेतू शोधू नये… दुसऱ्यांच्या भेटी या फक्त राजकीय खलबतांसाठी असतात… आमच्या भेटी या विकास काम आणि शुद्ध हेतू ठेवून असतात… इति #साहेब असं काळे यांनी म्हटले आहे.