गँगस्टर प्रसाद पुजारी हाँगकाँगमधून ताब्यात; पुजारीवर मुंबई शहरात डझनभर गुन्हे

Gangster Prasad Pujari :  भारतात खंडणी, खून आणि खुनाचा प्रयत्न अशा अनेक गुन्ह्यांमध्ये हवा असलेला गँगस्टर प्रसाद पुजारी याला चीनच्या अधिकाऱ्यांनी हाँगकाँगमधून ताब्यात घेतले आहे. या घडामोडीची पुष्टी करताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, तो हाँगकाँगहून शेनझेनला जाण्यासाठी उड्डाण घेणार असताना बनावट पासपोर्टच्या आरोपाखाली इंटरपोलकडून मिळालेल्या टीपनंतर त्याला पकडण्यात आले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुजारी, ज्याचे एका चिनी महिलेशी लग्न झाले आहे, तो पत्नी आणि मुलासह शेनझेनमध्ये राहतो. तो त्याच्या कुटुंबासह घरी परतत असताना त्याला पकडण्यात आले. पुजारीवर मुंबई शहरात डझनभर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2020 मध्ये, विक्रोळीतील एका बिल्डरला धमकावून त्याच्याकडून 10 लाख रुपयांची मागणी केल्याबद्दल पुजारी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रसादला देशात आणण्यासाठी सरकार प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  मात्र भारताचा चीनसोबत प्रत्यार्पण करार नाही, त्यामुळे आता ही प्रक्रिया कशी पर्ण होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.