‘ज्या व्यक्तीने देशासाठी इतकं केलं त्यांना मी साधं पाणी देखील देऊ शकलो नाही’, प्रत्यक्षदर्शी शिवकुमार ढसाढसा रडला !

नवी दिल्ली : तामिळनाडूच्या निलगिरी हिल्समध्ये बुधवारी एक दुःखद हेलिकॉप्टर अपघात झाला, ज्यामध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 13 जणांना प्राण गमवावे लागले. यावेळी प्रत्यक्षदर्शी शिव कुमार हे सर्वात पहिले होते ज्यांनी ही दुर्घटना पाहिली.

शिव कुमार हे एक ठेकेदार आहेत. ज्यावेळेस कुन्नूर जवळ हेलिकॉप्टर अपघात झाला त्यावेळी ते आपल्या भावाला भेटण्यासाठी जात होते. शिव कुमार यांचा दावा आहे की त्यांनी हवाई दलाचे हेलिकॉप्टर पडताना आणि आगीच्या भक्ष्यस्थानी जाताना पाहिले. ते आणि इतरही लोक घटनास्थळी पोहोचले होते.

शिवकुमारने यांनी सांगितले की, आम्ही तीन जणांना पडताना पाहिले. त्यापैकी एक जिवंत होते. त्यांनी पाणी मागितले. आम्ही त्यांना एका चादरीत ओढले आणि बचाव पथक त्यांना घेऊन गेले. शिव कुमार म्हणतात की तीन तासांनंतर कोणीतरी त्यांना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचा फोटो दाखवला आणि सांगितले की तो ज्या व्यक्ती बद्दल बोलत होता ते जनरल बिपिन रावत होते.

हे समजताच शिव कुमारला अश्रू अनावर झाले आणि तो ढसाढसा रडू लागला. रडत रडत शिवकुमार म्हणत होता. ‘मला विश्वासच बसत नाही ज्या माणसाने देशासाठी इतक केलं त्यांना मी साधं पाणी देखील देऊ शकलो नाही.’ हे समजल्यापासून मला झोप लागत नसल्याचे शिव कुमार सांगतात. दरम्यान, पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह मृत सैन्य अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.