जनरल बिपिन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक व एक सच्चे देशभक्त होते – मोदी

नवी दिल्ली- देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं एमआय १७ ५ व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळले होते.

डोंगरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तिथे तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अपघातात सीडीएस बिपिन रावत हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले,जनरल बिपिन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक व एक सच्चा देशभक्त होते. त्यांनी आपल्या सशस्त्र दलांचे आणि सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात मोठे योगदान दिले. सामरिक बाबींवर त्यांची अंतर्दृष्टी आणि दृष्टीकोन सकारात्मक होता. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. ओम शांती.

तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे मी अत्यंत दु:खी आहे, ज्यामध्ये आम्ही जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलातील इतर कर्मचारी गमावले आहेत. त्यांनी अत्यंत तन्मयतेने भारताची सेवा केली. मी त्याच्या कुटूंबीयांच्या शोकात सहभागी आहे. असे ट्विट मोदींनी केले आहे.