पशुधनावर आधारित शेळीपालन, कुक्कूटपालन व दुग्धव्यवसाय प्रशिक्षण घ्या आणि कमवा बक्कळ पैसा

चंद्रपूर : महाराष्ट्र उद्योजकता विकास केद्रांद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरीता दि. 11 ते 16 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

या प्रशिक्षणामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय यामधील उद्योगसंधी, शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, शेळी, गाय व कोंबड्याच्या विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन, औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतिबंधक उपाय त्यांचे संगोपन व व्यवस्थापन, संतुलित आहार, जीवनसत्वाचे महत्व, संसर्गजन्य रोग व त्यावर उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतींनी www.mced.co.in या संकेतस्थळावर दि. 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड, दुरध्वनी क्रमांक 9403078773, कार्यक्रम आयोजिका वनश्री रामटेके मो. 9766499599 यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड यांनी कळविले आहे.