Prakash Ambedkar | घाटकोपर दुर्घटना मानवनिर्मित, मृत्यूला BMC जबाबदार; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

Prakash Ambedkar | घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना (Ghatkopar accident) ही मानवनिर्मित असून, ती हत्येपेक्षा कमी नाही. या ‘हत्यांना’ BMC शिवाय कोणीही जबाबदार नाही, हे आपल्या सर्वांनाच माहिती असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

या मानवनिर्मित दुर्घटनेतील पीडितांमध्ये दोन रिक्षाचालक, एक कॅब ड्रायव्हर, एक टूरिस्ट ड्रायव्हर, एक डिलिव्हरी बॉय आणि एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना मुख्यमंत्र्यांनी मदत म्हणून केवळ पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. ज्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे, ते त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधार होते; यामध्ये काही महाराष्ट्रातील तर काही महाराष्ट्राबाहेरचे होते. ते सर्वजण आपलं घरदार सोडून चांगले जीवन जगण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबईत आले होते.

पाच लाख रुपयांमध्ये त्यांची नुकसान भरपाई कशी करणार किंवा मुलांचे भविष्य कसे सुरक्षित करणार? त्यांचा जोडीदार आणि आई-वडील त्यांच्यावर अवलंबून होते का? ते जगणार कसे? असे सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केले.

नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आंबेडकर यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी पीडित आणि जखमींबाबत किती निर्दयी वागले, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. राजावाडी रुग्णालय, (घाटकोपर) जेथे जखमींना दाखल करण्यात आले होते, ते मोदींच्या रोड शोपासून फक्त १० मिनिटांच्या अंतरावर होते पण, मोदींसाठी त्यांचा रोड शो अधिक प्रिय होता.

होर्डिंग कोसळला त्या ठिकाणी मी भेट दिली होती, तेव्हा मृतांच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपये आणि जखमींना 10 लाख रुपये मदत देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती, असे सांगून आंबेडकर यांनी आज त्या मागणीचा पुन्हा उल्लेख केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप