एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळत आहेत – महाजन

जळगाव – भाजप नेते आ. गिरीश महाजन यांना करोनाची लागण झाल्याची माहिती शनिवारी समोर आली.यावरून त्यांचे कट्टर राजकीय विरोधक एकनाथ खडसे यांनी शंका उपस्थित केली आहे.

खडसे म्हणाले, ईडीची चौकशी लागल्यामुळे एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांदा करोना झाला, अशी प्रतिक्रिया काही महिन्यांपूर्वी गिरीश महाजन यांनी दिली होती. मात्र त्यावेळी मला खरंच करोना झाला होता. आताही गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोना झालेला आहे. मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झालेली दिसत आहे आणि त्या भीतीतूनच त्यांना करोना झाल्याचा संशय आहे. तरीही माझी प्रार्थना आहे की, गिरीश महाजन लवकर बरे व्हावेत, त्यांची समाजाला गरज आहे, महाराष्ट्राला गरज आहे. त्यांची प्रकृती उत्तम राहावी, अशी मी प्रार्थना करणार आहे,’ असं यावेळी एकनाथ खडसे म्हणाले.

दरम्यान, खडसे यांनी केलेल्या या टीकेला महाजन यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ईडीच्या धाकाने एकनाथ खडसे हे चार वेळा कोरोना बाधीत झाले. अपंगाचे खोटे प्रमाणपत्र काय काढले, त्या प्रकरणी दिव्यांग बांधवांनी त्यांच्याविरुद्ध आंदोलने केली. आता ते मोक्काच्या धाकाने आपल्याला कोरोना झाल्याचे म्हणत असले तर त्यांना खरोखर ठाण्याच्या उपचाराची गरज आहे असं म्हणत महाजन यांनी पलटवार केला.

यानंतर पुन्हा खडसे यांनी महाजनांवर टीका केली. ते म्हणाले, मला ठाण्याला दाखवायची गरज नाही मात्र गिरीश महाजनांना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवायला पाहिजे असं म्हणत जोरदार टीका केली आहे. यानंतर आता गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या टीकेला पुन्हा एकदा उत्तर दिलंय. एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळत आहेत, असा पलटवार गिरीश महाजन यांनी केला. खोटेनाटे गुन्हे दाखल करायचे, पोलिसांवर दबाव आणून मोक्काची भीती दाखवण्याचे उद्योग ते करताय, असा आरोपही गिरीश महाजन यांनी केलाय. गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलंय.