हृदयद्रावक! गाढ झोपेत असलेल्या सिद्धीचा दुर्देवी मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारी घटना

रत्नागिरी | सर्पदंशाने (Snake Bites) मृत्यू झाल्याच्या बऱ्याचशा घटना समोर येत असतात. अशीच एक हृदय हेलवणारी घटना गुरुवारी (१३ ऑक्टोबर) पुढे आली आहे. रत्नागिरीत गाढ झोपेत असलेल्या एका मुलीला साप चावल्याने तिचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेने मृत मुलीचे कुटुंबीय हादरले असून परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील घोणसरे येथे सर्पदंशाने अकरावीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाला आहे. सिद्धी चव्हाण असे या मुलीचे नाव आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, यात एका उंदराचा पाठलाग करत साप घरात शिरला होता. यानंतर घरात शिरलेल्या सापाने झोपेत असलेल्या सिद्धी चव्हाण हिला 3 वेळा दंश केला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली आहे.

या घटनेनंतर सिद्धी चव्हाणला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेईपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे सिद्धी चव्हाणचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारची झोप घेत असलेल्या या मुलीला याची कल्पनाही नव्हती की आजची ही झोप तिच्यासाठी शेवटची ठरणार आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.