मुलींना पळवून नेऊन मोठ्या प्रमाणात धर्मांतर केलं जात आहे – चंद्रकांत  पाटील

पुणे – हजारो वर्षांपूर्वी आपल्या देशावरील आक्रमकांच्या हल्ल्यात आपले मानबिंदू उद्ध्वस्त केले गेले, त्याची पुन: स्थापना म्हणजे अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारणे आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. नगरसेवक आणि पुणे शहर भाजपा सरचिटणीस दीपक पोटे यांच्या संकल्पनेतून एरंडवणे येथील राजा मंत्री उद्यानाच्या प्रवेशद्वारावर अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे डिजिटल बोधचिन्ह आणि पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृतींचे लोकार्पण आ. पाटील यांच्या हस्ते झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश चिटणीस तथा पुणे शहर प्रभारी धीरज घाटे, विश्व हिंदू परिषद प्रांतसेवा प्रमुख तुषार कुलकर्णी, नगरसेविका आणि शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे, पुणे शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसुले, स्वीकृत सदस्या अॅड. मिताली सावळेकर, प्रभाग १३ चे भाजपा अध्यक्ष राजेंद्र येडे, सरचिटणीस बाळासाहेब धनवे, निलेश गरुडकर, अॅड. प्राची बगाटे आदींसह पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, हजारो वर्षांपूर्वी आपल्या देशावर आक्रमकांनी देशावर राज्य करण्यासाठी ज्या नितीचा अवलंब केला, त्यात आपले मानबिंदू उद्ध्वस्त करण्याला प्राधान्यक्रम होता. यात त्यांनी आपल्या श्रद्धास्थानांना धक्का लावत मंदिरे उद्ध्वस्त केली. अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे मंदिर हे त्यापैकीच एक होते. त्यासोबतच स्त्रीला भ्रष्ट देखील केले जात होते. त्यामुळे आपल्या मानबिंदुंची‌ पुन: स्थापना करणे म्हणजे राम मंदिर उभारणी आहे.

ते पुढे म्हणाले की, आपल्या देशात सर्वांना आपापल्या धर्मानुसार पूजा पद्धतीचं स्वातंत्र्य आहे. प्रत्येकजण आपापल्या धर्मानुसार आपल्या आराध्यांची पूजा करु शकतो. पण त्यावर अतिक्रमण किंवा आघात कधीही खपवून घेतला जाणार नाही. मोठ्या प्रमाणात आमच्या मुलींना आकर्षणं दाखवून पळवून नेऊन धर्मांतर केलं जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तोच प्रकार होत आहे. आपल्या मानबिंदुंना धक्का लावला जातो आहे. पण आता हिंदू जागृत झाला आहे. आता असले प्रकार चालणार नाहीत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नगरसेवक दीपक पोटे म्हणाले की, विरोधक आम्हाच्यावर टीका करताना म्हणायचे की,भाजपावाले सांगतात ‘मंदिर वहीं बनाएंगे, पर तारीख नहीं बताएंगे’. पण आता माननीय मोदीजींमुळे आता अयोध्येत राममंदिर उभारले जात आहे. त्यामुळे त्याची साक्ष देणाऱ्या प्रतिकृतेंचे लोकार्पण अतिशय दिमाखदार झाले पाहिजे, यासाठी आज हा कार्यक्रम घेतला. माननीय दादांचा नगरसेवकांनी वॉटर, मीटर, गटरच्या पुढे जाऊन काम केलं पाहिजे, असा आग्रह असतो. त्यानुसारच कोथरुड मधील प्रत्येक नगरसेवक आणि भाजपाचा पदाधिकारी काम करत असतो.