शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्या – प्रवीण तोगडिया

नागपूर : शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ या चौघांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी आज नागपुरात केली.

ते नागपुरात पत्रकारांशी संवाद साधत होते. प्रवीण तोगडिया पुढे म्हणाले की, संपूर्ण भारतवासीयांचे जशा भव्य आणि दिव्य राममंदिर निर्मितीची इच्छा होती असेच अदभूत राममंदिर अयोध्येत साकारल्या जात आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ या चार लोकांचे नेतृत्व नसते तर बाबरी पडली नसती आणि मंदिर उभे राहिले नसते.

या चौघांसोबत माझे खास नाते आहे. या चौघांना जोपर्यंत भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत मी म्हणेन की भारत सरकारने राम मंदिर आंदोलनाचा सन्मान केलेला नाही. या चौघांनाही भारतरत्न जाहीर करा आणि ज्या राम मंदिराच्या नावावर सत्तेत आला आहात त्याची ऋणमुक्ती सत्तेत असलेल्यांनी करावी’ असं तोगडिया यांनी म्हटलं आहे.