शांततेच्या संविधानिक मार्गावर चालण्याची सुबुद्धी सर्वांना दे; यशोमती ठाकूर यांचे विठ्ठलाला साकडे

पंढरपूर : देशासह राज्यातील शांतता बिघडविण्याच्या उद्देशाने काही मंडळी अराजकता माजविण्यात व्यस्त आहेत. अशा सर्वांना शांततेच्या संविधानिक मार्गावर चालण्याची सुबुद्धी सर्वांना दे असे साकडे घालतानाच राज्यातील बळीराजा सुखी होवू दे, अतिवृष्टीचे संकट टळून जनतेला सुखी समृद्ध आरोग्यदायी आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur)यांनी विठ्ठल चरणी लिन होत केली.

विदर्भातील ४२७ वर्षांची प्राचीन परंपरा असलेली श्री रुक्मिणी मातेची पालखी श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आली असता ॲड. यशोमती ठाकूर यांनी या पालखीसह विठुमाऊलीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या आई पुष्पमाला ठाकूर, कन्या आकांक्षा ठाकूर आदी मंडळी सहभागी झाली होती. यादरम्यान सुशोभित रथ, टाळ-मृदंगाचा निनाद, ‘ज्ञानबा तुकाराम’चा जयघोष करीत डोईवर तुळशी वृंदावन घेऊन ठाकूर या पालखी सोहळ्यातवारकरी भगिनींसह सहभागी झाल्या होत्या.

यावेळी विठ्ठल मंदिर समिती व्यवस्थापकीय मंडळ तसेच पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राज भादुले यांनी माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा सत्कार केला. श्री कौंडण्यपूर येथील पालखीला मोठी परंपरा आहे. दोन वर्षानंतर पायी वारी निघून आज पंढरपूर येथे दाखल झाल्याचा मोठा आनंद आहे. रुक्मिणी माता माहेरवरून सासरला आली आहे. ‘राज्यात यंदा सर्वत्र चांगला पाऊस होऊ दे. अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टळू दे. बळीराजा समृद्ध होऊ दे. धनधान्य पिकू दे. सर्वांना चांगले आरोग्य, सुख समृद्धी लाभू दे’, अशी प्रार्थना केल्याचे ठाकूर यांनी सांगितले.