स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना परिक्षेपर्यंत मुदतवाढ द्या – अभाविप

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये स्पर्धा (Savitribai Phule University Pune) परीक्षा केंद्र अंतर्गत यूपीएससी व एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी 11 महिन्याचा पूर्व परीक्षा तयारीचा कोर्स राबविला जातो. सदर विद्यार्थ्यांचा कोर्स ची मुदत मार्च अखेर संपुष्टात येत आहे. मात्र एमपीएससी पूर्व परीक्षा व यूपीएससी पूर्व परीक्षा अनुक्रमे 28 मे व ४ जून २०२३ रोजी होणार आहे. विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्र यु.पी.एस.सी. आणि एम.पी.एस.सी. च्या पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी हा कोर्स चालवते.

या कोर्सची रचना पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी सराव व्हावा म्हणून विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याच्या संदर्भात राबविला जातो. यासाठी प्रवेश परीक्षा घेऊन निवड केली जाते. यावर्षी परीक्षा कालावधी व कोर्स चा कालावधी यामध्ये दोन महिन्याचे अंतर पडले असून या कालावधीत विद्यार्थ्यांनी कुठे जायचे हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील दोन महिने पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना वस्तीगृहात राहण्याची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे विद्यापीठ अध्यक्ष महादेव रंगा यांच्या कडून करण्यात आली.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. प्रशासन या प्रश्नावर सकारात्मक विचार करून योग्य निर्णय देईल असे आश्वासन कुलसचिव सरांनी अभाविप ला दिले आहे. जर विद्यार्थी हिताचा निर्णय झाला नाही तर अभाविप तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा महादेव रंगा यांनी यावेळी दिला. निवेदन देताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे गणेशखिंड नगर सहमंत्री तीर्थ पुराणिक, धनंजय देव्हडे आणि स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.