निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांना नोटीस द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

भंडारा   : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 18 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी आज जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय संनियंत्रण व पेड न्यूज समितीची सभा संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन अर्चना यादव, मुख्याधिकारी नगर परिषद भंडारा विनोद जाधव, यासह निवडणुकीसाठी नियुक्त नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक मध्ये पहिल्या टप्प्याची निवडणूक 21 डिसेंबर रोजी पार पडली. यामध्ये भंडारा तालुक्यातील 141, मोहाडीमध्ये 40, तुमसर 44, साकोली 32, लाखनी 12, पवनी 59, लाखांदूर 61 अशी निवडणूक खर्च सादर न केलेल्या उमेदवारांची संख्या असून यांना तातडीने निवडणूक खर्च सादर करण्यासाठी बाबत नोटीस देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या वेळी दिले. तसेच जर त्यांनी वेळेत खर्च सादर केला नाही तर निवडणूक अधिनियममधील तरतुदीनुसार त्यांची उमेदवारी रद्द देखील होऊ शकते, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले.

नगरपंचायत मध्ये मोहाडी, लाखणी व लाखांदूर असे मिळून 84 उमेदवारानी अद्यापही खर्चाचा तपशील सादर केलेला नाही, असे नोडल अधिकारी खर्च व्यवस्थापन  जाधव यांनी बैठकीत सांगितले. येणाऱ्या 18 जानेवारी च्या निवडणुकीसाठी 601 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून त्या स्थळी कायदा व सुव्यवस्थेबाबतची पूर्वतयारी झाली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी यावेळी दिली. तर संशयास्पद आर्थिक व्यवहारावर लक्ष असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश तईकर यांनी सांगितले. मतदान व मतमोजणीच्या दिवशी ड्रायडेचे आदेश निर्गमित करण्याची सूचना कदम यांनी केली.