ओबीसींना राजकीय आरक्षण द्या अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करु – नारायण पाटील 

करमाळा –  ओबीसींना राजकीय आरक्षण (Political reservation to OBCs) द्या अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांनी दिला. ओबीसी आरक्षणाबाबत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनानंतर प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पाटील गटाच्या वतीने करमाळा मतदार संघातील ओबीसी शिष्टमंडळाने  (OBC delegation from Karmala constituency) पाटील यांच्या नेतृत्वाखाली माननीय तहसिलदार यांची भेट घेऊन आरक्षणाबाबत एक निवेदन दिले.याबाबत अधिक माहिती देताना  पाटील यांनी सांगितले की करमाळा मतदार संघात सध्या ओबीसी समाजाची एकप्रकारे जणगणना सुरु असुन ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या लोकसंख्येची तसेच मतदारांची आकडेवारी संकलित करण्याचे काम शासकीय स्तरावर होत आहे तर अधिक प्रमाणात पुर्णही झाले आहे. बरीच समान आडनावे ही अनेक जाती प्रवर्गात आढळून येतात. यामुळे केवळ आडनावावरुन जर ओबीसी आकडेवारी गोळा केली जात असेल तर त्यात त्रुटी आढळून येतील ही बाब आम्ही प्रशासनास सांगितली.

गावोगाव ओबीसीची आकडेवारी गोळा केली गेली आहे त्यास संबंधित गावातील ग्रामसभेचीही मंजूरी असावी जेणेकरुन इंपिरिअल डाटा (Imperial Data) तयार होताना सदर माहिती अधिक सक्षम होईल. यामुळेच प्रत्येक गावात तातडीची विशेष ग्रामसभा बोलावून त्यात ओबीसी यादीचे वाचन करण्यात यावे व मंजूरीचा ठराव घेतला जावा अशी मागणीही आपण प्रशासनाकडे केली आहे. ओबीसी समाजास राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवल्यास याचा परिणाम ग्रामविकासावर होऊ शकतो यामुळे आरक्षण मिळावे ही आपली आग्रही भूमिका असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी स्पष्ट केले.