नव्या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला स्थान द्या; रामदास आठवले यांची मागणी

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात एक आदर्श भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी घेतली आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना संधी देऊन देवेंद्र फडणवीस राज्यात किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत. महाराष्ट्राच्या हिता ला सर्वोच्च प्राधान्य देणारे देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन आम्ही करीत आहोत. एकनाथ शिंदे यांच्या नव्या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला स्थान द्यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे.

ते म्हणाले, भाजप कडे निवडून आलेले 106 स्वतःचे आमदार असताना तसेच अपक्षांचा पाठिंबा असताना देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत असणाऱ्या 50 आमदारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होतील असा पूर्ण विश्वास महाराष्ट्राला होता. मात्र हा अंदाज खोटा ठरवीत अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून संधी दिली हा ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मोठ्या मनाचा मोठा विचार देवेंद्र फडणवीस यांनी केला असून मुख्यमंत्री पदाचा मोह आम्हाला नसल्याचे फडणवीस यांनी दाखवुन दिले.

चालून आलेले मुख्यमंत्री पद मित्रपक्षाला देण्याचा महान विचार देवेंद्र फडणवीस यांनी केला असून एक नवा आदर्श (new ideal) महाराष्ट्राच्या राजकारणात घालून दिला आहे. या सत्ता परिवर्तन मध्ये मित्रपक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष भाजप सोबत कायम राहिला आहे.त्यामुळे राज्यात सत्तापरिवर्तन होऊन नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होणाऱ्या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला मंत्रिपद द्यावे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि राज्याचे नवे किंगमेकर देवेंद्र फडणवीस यांचे ही मनःपूर्वक अभिनंदन रामदास आठवले यांनी केले आहे.