गोवा निवडणूक : जोशुआ डिसुझा यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

म्हापसा : गोवा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आता जोमाने मैदानात उतरले असून कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अनेक दिग्गज नेते या निवडणुकीत आपले नशीब आजमावत असून सध्या या निवडणूक प्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

आज म्हापसाचे भाजपचे तरुण-तडफदार आमदार जोशुआ डिसुझा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी या मतदार संघाचे प्रभारी भाजप आमदार महेश लांडगे , भाजप आमदार राम सातपुते आदी मोजक्याच नेत्यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जोशुआ डिसुझा हेच या निवडणुकीत विजयी होतील असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला.

जोशुआ हे भाजपचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा यांचे सुपुत्र आहेत.फ्रान्सिस डीसुझा यांच्या निधनानंतर २०१९ साली झालेल्या पोटनिवडणुकीत जोशुआ डिसोझा यांचा विजय झाला. जोशुआ डिसुझा विरुद्ध सर्वपक्षीय नेते एकवटल्याचे दिसत आहे.

या मतदारसंघात श्यामसुंदर नेवगी १९८० काँग्रेस अर्सच्या उमेदवारीवर निवडून आले होते. त्यानंतर १९९९ साली राजीव काँग्रेसच्या उमेदवारीवर फ्रान्सिस डिसोझा (बाबूश) स्वत: निवडून आले होते. त्यामुळे काँग्रेसला एकदाही या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी लाभली नाही. १९९९ च्या विजयानंतर बाबूशने भाजपात प्रवेश केला होता. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे.

गेली दोन दशके भाजपाला प्रतिनिधीत्व करण्याची संधी देणाऱ्या या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाला अद्यापही प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळालेली नाही.या मतदार संघातून किमान पाच उमेदवार रिंगणातून दिसणार आहेत. यात भाजपा बरोबर काँग्रेस तसेच आम आदमी पार्टी हे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून दिसणार आहेत.