शिवसेनेला मोठा धक्का; मातब्बर नेत्याने घेतला शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय

Mumbai – शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेसाठी हा खूप मोठा झटका आहे. गोपाळ लांडगे यांचं कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये चांगलं प्रभुत्व आहे. आता त्यांनी शिंदे सेनेला (Shinde Sena)साथ दिल्याने निश्चितच शिवसेनेच्या अडचणी वाढणार आहेत.

कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे (Gopal Landge) यांनी आपल्या पदाचा त्याग करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण प्रमाण मानून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण डोंबिवलीचे माजी नगरसेवक राजेश मोरे, माजी नगरसेवक विशाल पावशे, माजी नगरसेवक प्रशांत काळे यांनी देखील यापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांना आपला पाठींबा दर्शवला आहे.

दरम्यान, उल्हासनगरचे माजी नगरसेवक कलवंत सिंह आणि माजी नगरसेवक अरुण आशन यांनी देखील शिंदे यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले गोपाळ लांडगे यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना पाठींबा दिल्याने कल्याण डोंबिवलीमधील शिंदे गटाची ताकद वाढली आहे.