झोपी गेलेल्या ईडी सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष देण्यास वेळ नाही : नाना पटोले

गडचिरोली  -राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी सरकारच्या मदतीकडे आशेने पहात आहे परंतु राज्यात झोपे गेलेले, आंधळे, बहिरे ईडी सरकार आहे. या सरकारला शेतकऱ्यांचे नुकसान दिसत नाही म्हणून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी व त्यांना आधार देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर आलो आहे. या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी काँग्रेस राज्य (NCP) सरकारकडे प्रयत्न करेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला आहे.

गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाला भेटी देऊन शेतकरी व गावकरी यांच्याशी संवाद साधला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, काँग्रेसचे नेते राज्यांच्या अनेक जिल्ह्यात दौरा करीत आहेत. झोपी गेलेल्या सरकारला जागे करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. काँग्रेस नेते व कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आधार देण्याचे काम करत आहेत. मुसळधार पावसात लोकांचे बळी गेले, जनावरे मेली, शेतातील पिके गेली. घरांची पडझड झाली आहे पण सरकारला जाग आली नाही, प्रशासनामध्येही अनास्था आहे. आम्ही नुकसानीची पाहणी करून त्याचा अहवाल मुख्यमंत्री, मुख्य सचिव व राज्यपाल यांनाही सादर करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात महापुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक गावे पुराने वेढलेली आहेत. याभागातील जमीन पाण्याखाली गेली आहे. याला तेलंगणा सरकारचा मेडीगट्टा प्रकल्प कारणीभूत आहे. २०१४-१९ दरम्यान भाजपाचे सरकार राज्यात असताना त्यांच्या व तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या सहकार्याने मेडीगट्टा प्रकल्पाला हातभार लावला गेला. याप्रश्नी मी विधानसभा अध्यक्ष असताना सरकारशी यासंदर्भात बोललो होतो पण आजचे जे नुकसान होत आहे ते भाजपा सरकारचेच पाप आहे.

गडचिरोली दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देऊन पूरपरिस्थिती बाबत आढावा घेतला व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी,  आनंदराव गेडाम,  पेंटाराम तलांडी, जिल्हाधिकारी संजय मीना, डॉ. नामदेव किरसान, संदीप गड्डमवार, शहर अध्यक्ष सतिश विधाते, जेसा मोटवाणी आदी उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या वर्धा जिल्ह्याला भेट देऊन तेथील नुकसानीची पाहणी करणार आहेत.