सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न – छगन भुजबळ

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ओळख मुख्य इमारत असून त्यासमोर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभा करावा अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिल्या. येत्या 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असेही ते म्हणाले.

छगन भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले पुतळा उभारणीबाबत विद्यापीठातील जागेची प्रत्यक्ष पाहणी आज केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, डॉ. संजय चाकणे, डॉ. महेश अबाळे, डॉ. सुधाकर जाधवर, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. मनोहर चासकर, ज्येष्ठ संशोधक हरी नरके आदी उपस्थित होते.

छ्गम भुजबळ म्हणाले, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून लवकरात लवकर पुढील निर्णय घेण्यात येईल. विद्यापीठ प्रशासनाने पुतळा उभारणीबाबत आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर घेण्याची कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे विद्यापीठ आवारात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी निधी मिळण्याकरिता तात्काळ सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे पाठवण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.