दर्जेदार विकासकामांना शासनाचे प्राधान्य – एकनाथ शिंदे

औरंगाबाद : पाणी, वीज, रस्ते आदी मूलभूत सुविधा दर्जेदाररित्या नागरिकांना मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मिटमिटा येथील भारत टॉवर ते कोमल नगर रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी मंत्री शिंदे बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, उदयसिंह राजपूत, चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, सिद्धांत शिरसाट आदी उपस्थित होते.

मंत्री शिंदे म्हणाले, काँक्रिट रस्ता असल्याने टिकाऊ रस्ता या भागातील नागरिकांना मिळणार आहे. या ठिकाणी अशा रस्त्याची आवश्यकता होतीच. या रस्त्यासह मीरा नगर, सुंदर नगर येथील रस्ता आवश्यक असल्याचे आमदार शिरसाट यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या मागणीचा विचार करत मीरा नगर, सुंदर नगरच्या रस्त्याचा प्रस्ताव सादर करा, त्या रस्त्यासाठीही निधी उपलब्ध करून देणार असल्याचे शिंदे म्हणाले. शिवाय शासनाच्या 1650 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचाही या भागाला लाभ होणार असल्याचेही ते म्हणाले.

आमदार शिरसाट यांनी मीरा नगर, सुंदर नगर येथील रस्ता आवश्यक असल्याचे सांगतांना पडेगाव, मिटमिटावासीयांच्या विकासाला प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास परिसरातील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.