ग्रामपंचायत पोट निवडणूकीचा कार्यक्रम अखेर जाहीर

पुणे – राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.

नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये 22 नोव्हेंबर 2021 (सोमवार) पर्यंत सुधारणा करण्यात येईल. तहसिलदारांनी निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक 22 नोव्हेंबर 2021 (सोमवार) आहे.

उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे 30 नोव्हेंबर (मंगळवार) ते 6 डिसेंबर (सोमवार) या कालावधीत आणि सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या वेळेत सादर करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 7 डिसेंबर (मंगळवार) रोजी सकाळी 11 वाजल्यापासून होईल आणि छाननी संपेपर्यंत ही प्रक्रीया चालेल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 9 डिसेंबर (गुरुवार) असून वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्याच दिवशी दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

मतदान 21 डिसेंबर (मंगळवार) रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत राहील. मतमोजणी 22 डिसेंबर (बुधवार) रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्या ठिकाणी व वेळेनुसार होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 27 डिसेंबर 2021 (सोमवार) पर्यंत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

जिल्ह्यात वेल्हे तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींमधील 65 जागा, भोर 71 ग्रामपंचायती 121 जागा, पुरंदर 16 ग्रा.पं.-27 जागा, दौंड 6 ग्रा.पं.-6 जागा, बारामती 10 ग्रा.पं.-13 जागा, इंदापूर 6 ग्रा.पं.-8 जागा, जुन्नर 31 ग्रा.पं.-55 जागा, आंबेगाव 33 ग्रा.पं.-55 जागा, खेड 36 ग्रा.पं.-49 जागा, शिरुर 8 ग्रा.पं.-12 जागा, मावळ 15 ग्रा.पं.-19 जागा, मुळशी 35 ग्रा.पं.च्या 63 जागांसाठी तर हवेली तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीच्या 10 जागा अशा एकूण 317 ग्रामंपचायतीतील 503 जागांसाठी पोट निवडणूक होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

You May Also Like