देवकीबाई बोबडे हत्याकांडाचा अखेर झाला पर्दाफाश; आरोपीला अटक झाल्यावर सर्वांनाच बसला धक्का

नागपूर : नंदनवन पोलिस ठाण्याअंतर्गत न्यू नंदनवन येथे वास्तव्यास असलेल्या निवृत्त महिला डॉक्टर देवकीबाई बोबडे यांच्या हत्याकांडाचा पर्दाफाश झाला आहे. देवकीबाई यांच्या नातवानेच आपल्या ७६ वर्षीय आजीची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मितेश पाचभाई असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अमेरिकेला जाण्यासाठी पैशाची गरज असल्याने त्याने आजीची हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. मितेश सध्या इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.

गेल्या शनिवारी भरदिवसा आरोपीने देवकीबाई यांच्या घरात शिरून त्यांचे दोन्ही हात खुर्चीला बांधून धारदार शस्त्राने गळा कापून त्यांची हत्या केली. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास हे हत्याकांड उजेडात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी देवकीबाई यांचे कुटुंबीय, इतर नातेवाईक आणि जवळपासच्या लोकांची चौकशी करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांनी ५० हून अधिक लोकांची चौकशी केली. अखेर आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आणि देवकीबाई यांच्या नातवानेच त्यांची हत्या केल्याची माहिती समोर आली.

देवकीबाई बोबडे नंदनवन पोलिस ठाण्याजवळील गायत्री कॉन्व्हेंट परिसरात आपल्या मुली आणि जावयासोबत राहात होत्या. त्या वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय अधिकारी पदावरून निवृत्त होत्या. तर त्यांचे पती जीवनदास हे शिक्षक होते. शनिवारी सकाळी देवकीबाई यांची मुलगी आणि जावई कामावर निघून गेल्यानंतर दुपारी १२ ते सायंकाळी ६.३० पर्यंत त्या आणि त्यांचे परी घरात एकटेच होते. याचदरम्यान, आरोपीने त्यांच्या घरात शिरून त्यांची निर्घृण हत्या केली.

सायंकाळी मुलगी घरी परतल्यानंतर तिला आई देवकीबाई या मृतावस्थेत आढळून आल्या. आईला अशा अवस्थेत पाहून मुलीचे आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून शेजारी धावून आले आणि लगेच नंदनवन पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अखेर आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.