पानसनाला सुशोभीकरणामुळे शनि-शिंगणापूरच्या वैभवात मोठी भर !

अहमदनगर : शिंगणापूर हे जगप्रसिद्ध असे शनिभगवंतांचे स्वयंभू स्थान असलेलं क्षेत्र आहे. सुमारे सहाशे वर्षांपूर्वी या ठिकाणी शनिदेवाची मुर्ती पानस नाल्यात वाहून आल्याचा इतिहास आहे. नंतर या वाहून आलेल्या शनिदेवाच्या मुर्तीची येथील भाविक ग्रामस्थांनी प्राणप्रतिष्ठा केली. थोड्याच दिवसात शिंगणापूरसह परिसरातील गावांतील लोकांचे शनिशिंगणापूर हे श्रद्धास्थान बनले. आतातर महाराष्ट्र राज्यासह देश-विदेशातून भविकभक्त शनिदेवाच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने दरवर्षी लाखोंच्या संख्येने शनिशिंगणापूरला येतात.

मात्र शनिदेवाच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या येथील पानसनाल्याची अवस्था ही कालांतराने अगदी गटारीसारखी झाली होती. पण 2009 च्या विधानसभा निवडणुकीत नेवासा तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून व त्यानंतर आता 2019 मध्ये पुन्हा लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री म्हणून कारभार पाहण्याची संधी शंकरराव गडाख साहेब यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून 2009 ते 2014 या कालावधीत हाती घेतलेल्या पानसनाल्याचे सुशोभीकरण कामासाठी 55 कोटी रुपये निधी खर्च करुन पानसनाला (मंदिरघाट) सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. आणि आज नेत्रदीपक असं काम त्या ठिकाणी उभं राहिलं.

भाविकांची श्रद्धा असलेल्या या पानसनाल्याच्या (मंदिरघाट) सुशोभिकरणमुळे श्रीक्षेत्र शनिशिंगणापूरसह परिसरातील गावाच्या वैभवात भर पडली. (मंदिरघाट) सुशोभीकरण आणि वाहतं फेसाळलेलं पाणी यामुळे अगदी प्रेमात पडावं असं हे नयनरम्य व निसर्गरम्य ठिकाण भाविकाना साद घालीत आहे.

या पानसनाला (मंदिरघाट) सुशोभीकरणाच्या अंतर्गत शनि स्थानाच्या पूर्वेला उत्तरेकडे वाहणारा जलाशय असून त्याकडे उतरणारा पूर्वमुखी घाट अशी रचना केलेली आहे. या घाटाचा विकास आराखडा करताना देवस्थानातील सद्यपरिस्थिती, भाविकांची होणारी गैरसोय, वाहनतळ, पादचारी व भविष्यातील भाविकांची होणारी वाढ यासह सर्व सोयी-सुविधांचा विचार केलेला आहे.

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी पाहिलेली स्वच्छ शनिशिंगणापूर ही संकल्पना या दृश्यातून दिसत आहे. गावातील लोक आवर्जून ही निसर्गरम्य वास्तू पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. शनिशिंगणापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अशाप्रकारची अनेक कामे नामदार शंकरराव गडाख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र शिंगणापूर देवस्थानने हाती घेतलेली आहेत.

हे देखील पहा