ऊसतोड कामगारांच्या दिव्यांग मुलांनी क्रिक्रेटचं मैदान गाजवलं; बांग्लादेशला केलं चारीमुंड्या चीत 

बीड: आई-वडील ऊसाच्या फडात असताना, ऊसतोड कामगारांच्या दिव्यांग मुलांनी बांग्लादेशाविरुद्ध सामना जिंकत, क्रिक्रेटचं मैदान गाजवलं अन तिरंगा फडकवला. यामुळं जिल्ह्याला लागलेली ऊसतोड कामगारांची ओळख पुसण्यासाठी आता मजुरांच्या मुलांनीच कंबर कसली आहे असं दिसतय.

ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. दरवर्षी जिल्ह्यातून जवळपास 5 ते 6 लाख ऊसतोड कामगार हे ऊसतोडीसाठी स्थलांतरीत होतात. यामुळं जिल्ह्यातील वाड्या, वस्त्या, तांडे ओस पडतात. मात्र याच ऊसतोड कामगारांच्या दिव्यांग मुलांनी क्रिकेटचं मैदान गाजवलंय.

ज्योतिराम घुले आणि राजू चव्हाण या मैदान गाजवणाऱ्या बीडच्या दोन खेळाडूंची नावे आहेत. या दोघांचीही भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्यानंतर, बांग्लादेश विरुद्ध भारत या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी ज्योतिराम घुले यांनी नेतृत्व केलं, तर राजू चव्हाण हे प्लेअर म्हणून खेळले. यादरम्यान त्यांनी बांग्लादेश विरुद्ध 2 मॅचेस जिंकून देशाची मान उंचावून तिरंगा फडकवला आहे.

याविषयी बांग्लादेशाविरुद्ध खेळतांना कर्णधारपद भूषविलेले ज्योतिराम घुले म्हणाले, की आज खूप आनंद होतोय. बांगलादेशाविरुद्ध आम्ही 2 वन-डे क्रिकेट मॅच जिंकलो आहोत. हा सामना मी कर्णधार असतांना जरी जिंकला असला, तरी हा आमच्या संपुर्ण भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचा विजय आहे. तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र ही ओळख कुठेतरी आम्ही ऊसतोड कामगारांची मुलं म्हणून पुसण्याचा प्रयत्न करत आहोत. माझ्या आईवडिलांनी 12 वर्ष ऊस तोडला, यादरम्यान मी देखील त्यांच्यासोबत जात होतो. हे करत असताना माझं स्वप्न साकार करण्यासाठी, अनेक अडचणी अनेक संघर्ष करावा लागला. आज जर विचार केला तर इतर जिल्ह्यातील लोकं बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे, आणि कामगारांची मुलं काय करणार ? असं म्हणतात. मात्र आम्ही आता सिद्ध करून दाखवलं असून हा विजय आम्ही ऊसतोड कामगारांना समर्पित करत आहोत.

क्रिकेट खेळत असतांना अशी एक खंत वाटते, ती म्हणजे सर्वसामान्य क्रिकेट असताना, त्यांना लाईक्स मिळतात. त्यांना जे स्थान मिळतं ते आम्हाला देखील मिळालं पाहिजे. जर आम्हाला बीसीसीआयने साथ दिली, पाठीवर थाप दिली, तर नक्कीच आम्ही देशासाठी वर्ल्डकप, आशिया कप जिंकून आणू. त्यासाठी आमचंही स्थान तितकं झालं पाहिजे आणि जर असं झालं तर त्यांच्यापेक्षाही पुढे जाऊन देशासाठी भारतीय ध्वज सर्व ठिकाणी फडकवू…असं ज्योतीराम घुलेने म्हटले आहे.

आम्ही बांग्लादेशाविरुद्ध खेळलो या सामन्याचा खूप आनंद वाटतो. तर दुसरीकडं काहीसं दुःख ही वाटतं. आज आम्ही मैदानात खेळत आहोत, मात्र आजही आमचे आई-वडील भाऊबंद उसतोडीला जातात आणि ऊसतोड करून आमची उपजीविका, आमचा खर्च भागवला जातो. मात्र हे बंद करण्यासाठी आणि आमच्या जिल्ह्याला ऊसतोड कामगारांची लागलेली ओळख पुसण्यासाठी, आम्ही क्रिकेटच्या माध्यमातून हा प्रयत्न करत आहोत असं राजू चव्हाणने सांगितले आहे.