Gujrat Accident:  माचू नदीतून १३२ जणांचे मृतदेह बाहेर काढले, 175 हून अधिक लोक बचावले

Morbi Bridge Collapse : गुजरातमधील मोरबी येथील माचू नदीवर रविवारी (३० ऑक्टोबर २०२२) केबल पूल तुटला . या अपघातात आतापर्यंत  १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, आतापर्यंत 175 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. मदत आणि बचाव कार्य जोरात सुरू आहे. गुजरात सरकारचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी सोमवारी सकाळपर्यंत मृतांची संख्या १३२ आहे अशी माहिती दिली आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी पाच सदस्यीय चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे.

गुजरात पोलिसांनी आतापर्यंत 130 मृतदेह सापडल्याची माहिती दिली आहे.यापूर्वी पंचायत मंत्री ब्रिजेश मेरजा यांनी सांगितले होते की, मोरबी येथील केबल पूल दुर्घटनेत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे राजकोटचे भाजप खासदार मोहन कुंडारिया म्हणाले की, आम्ही या घटनेची गंभीर दखल घेत आहोत. बचावकार्य सुरूच आहे. आतापर्यंत सापडलेल्या मृतदेहांमध्ये लहान मुले, महिला आणि वृद्धांचा समावेश आहे.

पीएम मोदींनी या अपघाताबाबत गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अधिकाऱ्यांना जखमींवर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. गुजरात सरकारने अपघाताच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत.

गुजरात सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि जखमींच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.