जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी एकनाथ खडसे यांनीच संपवायला काढली ?

जळगाव –  माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातील दूध संघाच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. सहकार क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी समजले जाणारे एकनाथ खडसे व गिरीश महाजन या दोघांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. या निवडणुकीत भाजपच्या गिरीश महाजनांची सरशी ठरली असून २० पैकी १६ जागांवर शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, केवळ ४ जागा खडसेंच्या पॅनेलला जिंकता आल्या आहेत.

एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे खच्चीकरण केल्यानं निम्मी राष्ट्रवादी आमच्यासोबत आली आहे. त्यांची आमदारकी परत घ्यायला पाहिजे कारण, त्यांनी राष्ट्रवादी संपवायला काढल्याचा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला. ते जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या निवडणुकीत निम्मी राष्ट्रवादी आमच्यासोबत असल्याचा दावा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी एकनाथ खडसे यांनीच संपवायला काढली असल्यानं तुमची आमदारकी परत घ्यायला पाहिजे अशा प्रकारची खोचक टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.