पाकिस्तानमध्ये इंग्लंड संघाच्या हॉटेलजवळ गोळीबाराचा थरार, खेळाडूंच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

मुल्तान: इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर (England Tour Of Pakistan) असून उभय संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना आजपासून मुल्तान येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी इंग्लंड संघाच्या हॉटेलजवळ गोळीबाराचा थरार ऐकू आल्याने पाहुण्या संघाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

इंग्लंडचा संघ जवळपास १६ वर्षांनंतर पाकिस्तानात कसोटी मालिका खेळण्यासाठी आला आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुल्तानच्या मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच काल संध्याकाळी इंग्लंड संघाच्या हॉटेलबाहेर गोळीबाराचा आवाज ऐकू आला होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, काल संध्याकाळी हॉटेलपासून काही अंतर दूरच्या परिसरात गोळीबार (Gunshots Near England Team Hotel) झाला. ज्याचा आवाज इंग्लंड संघाच्या हॉटेलपर्यंत ऐकायला आला.

परंतु हॉटेलबाहेर झालेल्या या प्रसंगाचा इंग्लंड संघाच्या सरावावर कोणताही परिणाम झाला नाही. इंग्लंडच्या खेळाडूंनी पोलिसांच्या सुरक्षेखाली सराव केला. या कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ १-० ने आघाडीवर आहे.

जागी झाल्या जुन्या आठवणी 
पाकिस्तानमध्ये क्रिकेट संंघाची सुरक्षा नेहमीच चिंतेचा विषय राहिली आहे. २००९ मध्ये लाहोर येथे श्रीलंका संघाच्या बसवर आतंकवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात कोणत्या खेळाडूचा जीव तर गेला नाही, परंतु काही खेळाडूंना दुखापती झाल्या होत्या. ज्यानंतर सर्व संघांनी पाकिस्तानचा दौरा करण्यावर बंदी घातली होती.