खरी शिवभक्ती राज ठाकरेंकडून शिका… ‘हर हर महादेव’च्या दिग्दर्शकाची राष्ट्रवादीवर खरपूस टीका

Har Har Mahadev Controversy: ‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आक्रमक भूमिका घेतल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि कार्यकर्त्यांनी काल ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटावरून राडा घातला. त्यांनी या चित्रपटाचा चालू शो बंद पाडला. यादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून एका प्रेक्षकाला मारहाणसुद्धा करण्यात आली. आता या संपूर्ण प्रकरणावर चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेख अभिजित देशपांडे (Abhijeet Deshpnde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रेक्षकांवर असा भ्याड हल्ला करणाऱ्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा अभिजित देशपांडे यांनी निषेध केला आहे. तसेच त्यांनी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विकृत गुंड म्हणत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून खरी शिवभक्ती शिकण्याचा सल्लाही त्यांनी राष्ट्रवादीला दिला आहे.

काय म्हणाले अभिजित देशपांडे?
अभिजित देशपांडे यांनी ट्वीट करत लिहिले की, ठाणे येथील हर हर महादेवच्या शो मध्ये घुसून सामान्य मराठी प्रेक्षकावर भ्याड हल्ला केल्याबद्दल हर हर महादेवची पूर्ण टीम ह्या विकृत गुंडांचा निषेध करते. माझ्या छत्रपतींवर राजकारण खेळणं बंद करा आणि त्यांचे दैवी विचार आचरणात आणा. खरी शिवभक्ती काय असते हे राजसाहेब ठाकरेंकडून (Raj Thackeray) शिका.’

मनसेने पुन्हा सुरू केला शो
राष्ट्रवादीने हर हर महादेव चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये राडा घातल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे, MNS) ठाणे आणि पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी ५ मिनिटात विवियाना मॉल गाठून चित्रपट पुन्हा सुरू करण्यास सांगितले. यानंतर अविनाश यांनी स्वत: चित्रपटगृहात बसून संपूर्ण चित्रपट पाहिला. याचमुळे अभिजित देशपांडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये राज ठाकरे यांचे गुणगाण गायले आहे.