गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका, हार्दिक पटेलने कार्याध्यक्ष पदाचा दिला राजीनामा

अहमदाबाद – अनेक दिवसांपासून काँग्रेस हायकमांडवर नाराज असलेले गुजरातचे प्रदेशाध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी राजीनामा दिला आहे. हार्दिक पटेलने ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, मी काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की माझ्या या पाऊलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.

गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होऊ शकतात. अशा स्थितीत हार्दिकचा राजीनामा ही काँग्रेससाठी वाईट बातमी आहे. गुजरात काँग्रेसमधील कलह थांबण्याचे नाव घेत नाहीये.हार्दिक पटेलच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे तो पक्षावर नाराज असून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतो, अशी अटकळ बांधली जात होती. यानंतर आता पक्षांतर्गत सर्व काही मिटले असून, हार्दिकची नाराजी दूर झाल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र चिंतन शिबिरात सहभागी न झाल्याने हार्दिकने पुन्हा एकदा पक्षाप्रती नाराजी व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी बुधवारी पक्षाच्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राहुल गांधींच्या गुजरात दौऱ्यातही त्यांनी हार्दिक पटेल यांची वैयक्तिक भेट घेतली नव्हती.

खरं म्हणजे काँग्रेसने हार्दिकला कार्याध्यक्ष बनवले होते, पण त्याला कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. निवडणुका पाहता त्यांना काय करायचे ते सांगण्यात आले नाही. याशिवाय काँग्रेसचे काही नेते आपल्याला काम करू देत नसल्याचंही हार्दिक म्हणाला. राज्यात पक्षाचा कोणता कार्यक्रम सुरू आहे, याची माहितीही त्यांना दिली जात नाही. याशिवाय काँग्रेसच्या अनेक पोस्टर्समध्येही त्यांना स्थान दिलेले नाही. हे मुद्दे हार्दिकला खटकत होते.