हसन मुश्रीफ यांच्या घरावर पहाटेच ईडीची धाड; संतापलेल्या पत्नी म्हणाल्या, “आम्हाला गोळ्या मारुन..”

कोल्हापूर- आज (11 मार्च, शनिवार) राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरावर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने पुन्हा छापा टाकला. सकाळी 5 ते 6 च्या दरम्यान 4 ते 5 अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी पोहोचले. गेल्या दीड महिन्यात मुश्रीफ यांच्या छुप्या ठिकाणांवर सलग तिसऱ्यांदा आणि त्यांच्या घरावर दुसऱ्यांदा छापे टाकण्यात आले आहेत. आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्याच्या खरेदीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे. मुश्रीफ यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी घराबाहेर जमलेल्या जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या पत्नी (Hasan Mushrif Wife) सायरा मुश्रीफ यांनी घराच्या गेटवर येऊन कार्यकर्त्यांना शांतता राखण्यास सांगितले. यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या. त्या म्हणाला, अजून आम्हाला किती त्रास देणार. आम्हाला गोळ्या मारून संपवून टाका.’

कार्यकर्त्यांकडून सातत्याने भाजपविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. कार्यकर्ते म्हणत आहेत की, “मुश्रीफसाहेब घरात नाहीत. मुलाला घरी ताप आहे. जर त्याला काहीही झाले किंवा घरातील महिलांना काही त्रास झाला तर आम्ही शांत बसणार नाही.”