राज्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान

पुणे – राज्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेत पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा प्रशासनानं दिले आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या 104 गावातील 3 हजार 469 हेक्टरमधील फळबागा आणि शेती पिकांचं 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे.

हिंगोली जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामात संपकरी कर्मचारी सहभागी झाले आहेत. हे पंचनामे करण्याचे आदेश तलाठ्यांना देण्यात आले होते; त्या नुसार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकअधिकारी हे संपात सहभागी असून देखील पंचनामे करण्यासाठी गावागावंमध्ये दाखल झाले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले आहेत. जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अंदाजे 2 हजार हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे.