एकनाथजी, रामदास भाईंना आवरा; हेमंत देसाई यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर जाहीरपणे पातळी सोडून टीका करत आहेत. आधी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर टीका केली यानंतर या टीकेला कदम यांनी शेलक्या शब्दात उत्तर दिले आता ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी या टीकेचा समाचार घेतला आहे.

बंडखोर नेते रामदास कदम यांची रविवारी दापोलीत (Dapoli) सभा झाली. या सभेत त्यांनी शिवसेनेतील नेते आणि उद्धव ठाकरेंवरची नाराजी बोलून दाखवली. यावेळी त्यांनी भास्कर जाधव यांचीही चांगलीच धुलाई केली. त्याला प्रत्युत्तरादाखल भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत जहरी टीका केली.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले,  रामदास कदम यांनी काल उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात जी पातळी सोडून भाषा वापरली, त्याचा सार्वत्रिक निषेध होणे आवश्यक आहे. टीका करताना अर्वाच्यपणा किती करायचा याला काही मर्यादा! हा माणूस महाराष्ट्राचा मंत्री होता आणि पन्नास वर्षे शिवसेनेत होता. आपल्या अगोदरच्या नेत्याबद्दल इतके हीन स्वरूपाचे उद्गार ते कसे काय काढू शकतात!

टीका अवश्य करा, परंतु काही विवेक बाळगाल की नाही? रामदासभाईंना उत्तर देताना भास्कर जाधव यांनीही आपले भान सोडले..असो. माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मात्र मर्यादा पूर्णपणे सोडून महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखीनच अधोगती करण्याचा व राजकीय प्रदूषण वाढवण्याचा चंग बांधलेला दिसतोय… एकनाथजी, रामदास भाईंना आवरा! असं देसाई यांनी म्हटलं आहे.