वागळे-केतकर हे आजही साध्या घरात राहतात मग राऊतांसारख्या पत्रकाराकडे इतकी संपत्ती आली कशी ?

मुंबई – शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये राऊत यांच्या अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरच्या फ्लॅटचा समावेश आहे. एक हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली असल्याचं सांगितलं जातंय.

दरम्यान, राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांची एक फेसबुक पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. संजय राऊतांची संपत्ती आणि अरुण टिकेकरांचे ‘तारतम्य’ या शीर्षकाखाली त्यांनी लिहलेली ही पोस्ट विचार करायला भाग पाडणारी आहे.

ते म्हणतात, ईडी सूडचक्र सुरूच आहे.ते नक्कीच निषेधार्थ आहे.राजकारण यातून अधिक क्रूर व खुनशी होईल. पण संजय राऊत यांचे समर्थन करताना इतकी संपत्ती पत्रकाराकडे आली कशी ? यावरही बोलायला हवे. अरुण टिकेकर हे अतिशय संयमित पत्रकार होते. त्यांचं आणि शिवसेनेचे वाद प्रसिद्ध आहेत.१९९५ चे युती सरकार आल्यावर त्यांनी टीका केल्यावर सेनेने अनेकदा त्यांना दमदाटी केली. तेव्हा मला टिकेकर यांच्या तारतम्य सदरातील २५ वर्षांपूर्वीचा मजकूर आठवला. टिकेकरानी लिहिले होते की एका साधारण खपाच्या वृत्तपत्रात कार्यकारी संपादक अशी नोकरी करणारा माणूस मुंबईतील मध्यवस्तीत इतकी महागडी प्रॉपर्टी घेऊच कशी शकतो….? त्यावेळी जर ही संपत्ती इतकी डोळ्यावर आली असेल तर २५ वर्षात त्याचा गुणाकार किती मोठा असेल ?

कुमार केतकर हे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख वृत्तपत्राचे आयुष्यभर संपादक राहीले आहेत पण अतिशय साध्या घरात ते ठाण्यात राहतात…ही तुलना करायला हवी. एका चॅनेलचे संपादक राहिलेले निखील वागळे आजही छोट्या घरात राहतात..(Nikhil Wagale’s House) राज्यातील सर्व निवृत्त संपादक अतिशय साधे मध्यमवर्गीय जीवन जगतात. तेव्हा भाजपच्या विखारी सूडाच्या राजकारणाला विरोध करताना ही वस्तुस्थिती ही डोळेझाक होता कामा नये…फक्त ईडीला आता भाजपचे नेते दिसायला हवेत. असं त्यांनी म्हटले आहे.