कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे पडसाद मध्य प्रदेशमध्ये! हिजाब घालून क्रिकेट खेळत नोंदवला निषेध

भोपाळ : कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब प्रकरणाच्या निषेधार्थ मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील एका खाजगी महाविद्यालयात मुलींनी अनोख्या पद्धतीने हिजाब घालून निषेध नोंदवला. भोपळ येथील इंदिरा प्रियदर्शनी महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींनी क्रिकेट आणि फुटबॉल खेळून आपला निषेध व्यक्त केला.

यावेळी विद्यार्थिनींनी हिजाब हा आमचा हक्क असून तो आमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असे सांगितले. हिजाब घालूनच आपण खेळू शकतो, अभ्यास करू शकतो आणि आयएएस होऊ शकतो. सरकारने हिजाब सोडून महाविद्यालयातील अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असेही विद्यार्थिनींनी सांगितले.

मंगळवारी मध्य प्रदेशचे शालेय शिक्षण मंत्री इंदर सिंग परमार यांनी हिजाब बंदीचे समर्थन केले. त्यानंतर त्यांनी सांगितले की, हिजाब हा शालेय ड्रेसचा भाग नाही आणि आम्ही शैक्षणिक संस्थामध्ये शिस्तीला प्राधान्य देऊ. तसेच राज्यातील शाळांमध्ये ड्रेस कोड लागू असेल. मात्र, मंत्र्यांनी बुधवारी पुन्हा निवेदन जारी केले आणि त्यात आपले विधान चुकीचे मांडण्यात आल्याचे म्हटले. यासोबतच त्यांनी समान संहिता लागू न करण्याबाबतही ते म्हणाले.

कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाब प्रकरणाबाबत सुनावणी होणार आहे. यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी स्थापन केलेल्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठात गुरुवारी सुनावणी होणार आहे. हिजाब वादावर बुधवारी कर्नाटक उच्च न्यायालयातही सुनावणी झाली, परंतु न्यायमूर्तींनी हे प्रकरण मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी यांच्याकडे पाठवले, कारण मुख्य न्यायाधीश या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मोठे खंडपीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.