दहशतवाद्यांची माफी मागणाऱ्या मंत्र्याला हिमंता बिस्वा सरमा यांनी झापलं; नोटीसही पाठवली 

गुवाहाटी – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी मंगळवारी त्यांच्याच सरकारमधील मंत्री संजय किशन (Sanjay Kishan) यांना चांगलच झापलं आहे. बंदी घातलेल्या उल्फा (आय) प्रमुखाला खोटारडे म्हटल्यानंतर त्यांनी माफी मागितल्याबद्दल त्यांना खडेबोल सुनावले आहेत.

गरीब कल्याण संमेलनात सहभागी होण्यासाठी शिवसागर येथे आलेले आसामचे मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपसारख्या राष्ट्रवादी पक्षात अशा प्रकारच्या कोणत्याही कृतीला वा अशी विधाने करण्यास वाव नाही. ते पुढे म्हणाले की, संजय किशनने उल्फाची माफी मागून मोठी चूक केली आहे. भाजपसारख्या (BJP) राष्ट्रवादी पक्षात असे काम करण्यास वाव नाही, असे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. भविष्यात ते कधीही असे पाऊल उचलणार नाहीत. मी त्यांना भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी आणि दहशतवादाविरुद्ध लढण्याचा सल्ला दिला आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी 28 मे रोजी आसामचे कामगार कल्याण मंत्री किशन यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. किशनला नोटीसला उत्तर देण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात आला आणि त्यांनी दहशतवादी संघटनेची माफी का मागितली हे स्पष्ट करण्यास सांगितले.

ULFA (I) ने 13 मे रोजी तिनसुकिया विधानसभेचे आमदार संजय किशन यांच्यावर बहिष्कार घालण्याची धमकी दिली होती. किशन यांनी ULFA (I) प्रमुख परेश बरुआ यांना खोटारडे म्हटले होते. दुसऱ्या दिवशी संघटनेने निवेदन जारी करून माफी मागण्याची मागणी केली. दिब्रुगड आणि तिनसुकियामध्ये किशनवर बहिष्कार घालण्याची धमकी देत संघटनेने त्याला माफी मागण्यासाठी २४ तासांची मुदत दिली होती.

त्यावेळी किशन म्हणाले होते की, मी बरुआ यांच्या भावना दुखावणारे काही बोललो नाही आणि अनवधानाने असे काही बोलले असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो. यानंतर, उल्फा (आय) ने आणखी एक निवेदन जारी करून भाजप नेत्याच्या बहिष्काराचे पाऊल मागे घेण्याचे आवाहन केले होते. सरमा मुख्यमंत्री झाल्यानंतर उल्फा (आय) ने गेल्या वर्षी सरकारसोबत एकमताने युद्धविराम जाहीर केला होता.