पुरस्कार विजेता मराठी चित्रपट ‘लपाछपी’चा हिंदी रिमेक; ‘ही’ अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. लवकरच नुसरतचा छोरी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने आज प्रदर्शित केला. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

छोरी हा चित्रपट पुरस्कार विजेत्या व समीक्षकांनी गौरवलेल्या लपाछपी या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात नुसरत साक्षीच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये नुसरतशी संबंधित छोरी या पिशाच्च जगाची एक झलक आणि बरचं काही पाहायला मिळणार असून प्रत्येक दृश्यागणिक प्रेक्षकांवरचा ताण वाढत जाणार आहे. यातील थरार प्रेक्षकांचा थरकाप उडवणारा आहे. ‘साक्षी स्वत:ला वाचवू शकेल का?, ती तिच्या गर्भातील बाळाला वाचवू शकेल का?’ प्रेक्षकांना पडणाऱ्या या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपटात मिळणार आहेत.

विशाल फुरीया दिग्दर्शित ‘छोरी’ हा चित्रपट भूषण कुमार, कृष्णन कुमार, विक्रम मल्होत्रा, जॅक डेव्हीस आणि शिखा शर्मा यांनी एकत्रित रीत्या निर्मिती केली असून त्यामध्ये नुसरत भरुचा, मिता वशिष्ठ, राजेश जैस, यानिया भारद्वाज आणि सौरभ गोयल यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ वर भारतासहित अन्य २४० देशा-प्रदेशांमध्ये २६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.