शिवाजी ननवरे यांची ऐतिहासिक कामगिरी; जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर केले सर

करमाळा – करमाळा तालुक्यातील मूळचे कोंढेजचे असणारे व सध्या पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे (Shivaji Nanavare) यांनी जगात सर्वात उंच असलेल्या माउंट एव्हरेस्ट (Mount Everest) शिखरावर यशस्वीपणे चढाई केली आहे. त्यांच्या कामगिरीमुळे कोंढेजचे नाव देशपातळीवर पोहचले आहे. पुणे ग्रामीण विभागासह करमाळा परिसरातून ननवरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पोलिस दलात गडचिरोली येथे कर्तव्य करत असताना त्यांना गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली ती त्यांनी पुणे ग्रामीण येथे कर्तव्य करत व्यस्त वेळापत्रकातून कायम ठेवली. या मोहिमेची तयारी करताना त्यांच्या कुटुंबाची, ग्रामस्थांची,मित्र परिवाराची देखील मोठी साथ लाभली असून पत्नी छाया आणि मुलगी देवयानीचा आनंद आज गगनात मावत नसल्याचे चित्र आहे.

याबाबत माहिती देताना छाया ननवरे (Chaya Nunavre) म्हणाल्या, हे यश मिळालेलं पाहून आम्हा सर्वाना अतिशय आनंद होत आहे. साहेब एव्हरेस्ट शिखरावर यशस्वीपणे चढाई करतील याबाबत आम्हाला तिळमात्र देखील शंका नव्हती कारण त्यांनी केलेली मेहनत आम्ही जवळून पाहिली आहे. हे यश मिळवण्यासाठी साहेबांनी दिवसरात्र एक करून तयारी केली होती. हि चढाई सुरु असताना अचानक हवामान बिघडले होते मात्र मनोबल ढळू न देता या बिकट परिस्थितीचा सामना करत त्यांनी यश अक्षरशः खेचून आणले. या मोहिमेच्या निमित्ताने अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य केले त्या सर्वांचे आभार.

माउंट एव्हरेस्टबद्दल थोडक्यात माहिती

पृथ्वीवरील सगळ्यांत उंच ठिकाण कोणतं, असं विचारलं तर प्रत्येकाच्या तोंडी नाव येतं, ते म्हणजे “माऊंट एव्हरेस्ट”.माउंट एव्हरेस्ट हे हिमालय पर्वत रांगेतील एक उंच आणि उतुंग शिखर आहे.जगभरातला कुठलाही गिर्यारोहक असूद्यात, एव्हरेस्ट सर करणं हे त्याचं स्वप्न असतंच. हे चीनच्या स्वायत्त प्रदेश नेपाळ आणि तिबेट यांच्या मध्यभागी ८ हजार ८४८ मीटर म्हणजेच २९ हजार ०३२ फुटांवर आहे. जगातील सगळ्याच गिर्यारोहकांचे स्वप्न राहिलेल्या माऊंट एव्हरेस्टचं नाव हे रॉयल जिऑग्राफिकल सोसायटीने सर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या स्मरणार्थ दिलेलं आहे. ऑक्सिजनची कमतरता या ठिकाणी असते, हवामान देखील अचानक बिघडते यामुळे एव्हरेस्टची चढाई करणे सर्वात धोकादायक आहे.