…म्हणून पुण्यातील ‘ते’ चार गावं महापालिका हद्दीत घेतले, गृहमंत्र्यांना विधानसभेत स्पष्टच सांगितलं

पुणे : पुणे शहरातील वाढलेल्या अवैध धंद्यांबद्दल आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली. या लक्षवेधीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले. ज्या पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैध धंदे सुरु आहेत, तिथल्या पोलीस प्रमुखांची ही जबाबदारी आहे की त्यांनी ते अवैध धंदे बंद करावेत. संबंधित पोलीस प्रमुखांकडून माहिती घेऊन अवैध धंदे ताबडतोब बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच पुणे शहरातील सर्व आमदारांना एकत्र घेऊन पोलीस प्रमुखांसोबत बैठक घेतली जाईल. या परिसरात घडणारे गुन्हे कायमस्वरुपी कसे थांबवता येतील याकडे लक्ष दिले जाईल, असे गृहमंत्री म्हणाले.

खडकवासला (जि. पुणे) क्षेत्रातील गुन्हेगारी रोखण्यासाठी नांदेड, किरकीटवाडी, नांदोशी व खडकवासला या चार गावांचा पुणे महानगरपालिका हद्दीत समावेश करण्यात आला आहे. हवेली पोलीस स्थानकाच्या अखत्यारीत असलेल्या या गावांना आता नांदेड सिटी या नव्याने प्रस्तावित असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये वर्ग केले जाईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. तसेच राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही गावे पोलीस आयुक्त कार्यालयाला जोडावीत अशी मागणी सदस्य भीमराव तापकीर यांनी केली. मात्र भौगोलिकदृष्ट्या विचार करुन सिंहगडच्या अलीकडची गावे राजगड पोलीस स्थानकात तर पलीकडची गावे हवेली पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आली आहेत, असे गृहमंत्री म्हणाले.

या लक्षवेधीच्या चर्चेदरम्यान आमदार चेतन तुपे यांनी शहरी भागात नार्कोटिक्स नियंत्रण विभाग सशक्त करण्याची मागणी केली. सध्या लहान मुलेदेखील अमली पदार्थांच्या आहारी जात असून ते थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यासंबंधीची मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देत असताना गृहमंत्री म्हणाले की, हडपसर येथे दोन पोलीस स्थानके मंजूर करण्यात आली आहेत. जागा उपलब्ध झाल्यास पोलीस स्थानके लगेच सुरु करता येतील. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अमली पदार्थ विरोधी मोहीम चालवण्यासाठी पोलीस स्थानकात काही उपाययोजना करण्यासंबंधी सांगितले आहे. सध्या हे प्रायोगिक तत्त्वावर सुरु असून लवकरच याची अंमलबजावणी राज्यभर करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.