घराच्या रेडी रेकनरच्या दारात १० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता, बावनकुळे यांनी दर्शवला विरोध 

नागपूर : राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना दरवाढीची मोठी झळ बसणार आहे. कारण येत्या १ एप्रिलपासून घराच्या रेडी रेकनरच्या दारात १० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. या निर्णयाला आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोध दर्शवला आहे. गरजवंतांनी हक्काच्या घरात राहायचेच नाही का ? याला न्याय कसा म्हणायचा असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रात रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकार घेण्याच्या बेतात आहे. या निर्णयामुळे सामान्यांचे हक्काच्या घरात राहण्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राज्याचे माजी ऊर्जा मंत्री व भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हा निर्णय सामान्यांवर अन्याय करणारा असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. कोव्हीडच्या संकटानंतर बांधकाम क्षेत्राला आलेली मरगळ झटकण्यासाठी हा दर नियंत्रणात राहणे गरजेचे आहे. शिवाय दर वाढविण्यापेक्षा तो ठरविण्याच्या पद्धतीतील त्रुटी संपुष्टात आणण्याची गरज आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील साधारणतः मुंबईसह पुणे, ठाणे आणि नागपूर या शहरातील घरे महागणार आहेत. आजच्या घडीला घर खरेदी करताना भराव्या लागणाऱ्या स्टॅम्प ड्युटीतही वाढ होणार हे निश्चित. शिवाय कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षांसाठी थांबविण्यात आलेला १ टक्क्यांचा मेट्रो सेस येत्या १ एप्रिलपासून आकारण्यात येणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण निर्णय दुर्भाग्यपूर्ण असून, त्याचा मोठा फटका सामान्यांना बसणार असल्याची चिंता आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.