अश्लील व्हिडिओ दाखवत छेडछाड करणाऱ्या मुख्याध्यापकाला मुलींनी शिकवला धडा; झाडू- काठीने दिला चोप

कर्नाटक: कर्नाटकातील एका घटनेच्या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. येथील एका शाळेच्या वसतिगृहात अल्पवयीन मुलींची छेड काढल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाला विद्यार्थिनींनी मारहाण केली आहे. ही घटना कर्नाटकातील श्रीरंगपटना येथील कटेरी सरकारी हायस्कूलमध्ये घडली, जिथे मुख्याध्यापकाने शाळेच्या वसतिगृहातील अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

ही घटना मंड्या जिल्ह्यातील आहे, जिथे पांडवपुरा तालुक्यातील कटेरी गावातील शाळेच्या वसतिगृहातील मुलींनी एका अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत मुख्याध्यापकाला बेदम मारहाण केली आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकाला झाडू आणि काठीने चोप दिला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनींना आपल्या खोलीत बोलावून त्यांच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. हा प्रकार इतरांना सांगितल्यास त्यांच्या बदली प्रमाणपत्रात चारित्र्याबद्दल वाईट लिहू, असा इशाराही मुख्याध्यापकांनी दिल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. तसेच मुख्याध्यापक मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत असल्याचा आरोपही विद्यार्थिनींनी केला आहे. याचा चांगलाच धडाही त्यांनी मुख्याधापकाला शिकवला. त्यांनी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींसह मुख्याध्यापकाला लाठीने कुटला. याचवेळी केआरएस पोलिसांत मुख्याधापकाविरुद्ध तक्रारही दाखल केली.