गेल्यावेळची उधारी द्या,मगच पुढं जावा; हॉटेल मालकाने अडवला सदाभाऊंचा ताफा

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीमुळे चर्चेत असणारे शेतकरी नेते सदाभाऊ खोत हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांचा ताफा सोलापुरातील एका हॉटेल मालकाने अडवल्याची घटना घडली. गेल्या निवडणुकीवेळी राहिलेले बिल द्यावे यासाठी सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला असल्याची माहिती आहे. ताफा अडवल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी म्हणजे, 2014 सालच्या माढा लोकसभा निवडणुकीमध्ये (2014 Madha Lok Sabha Election) राहिलेले 66 हजार 450 रुपयांचे बिल सदाभाऊ खोत यांनी दिले नसल्याचा आरोप सांगोला तालुक्यातील मांजरी येथील हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी केला. त्या बिलाची मागणी करण्यासाठी आज त्यांनी चक्क सदाभाऊ खोत यांचा गाडीचा ताफाच अडवला.

अशोक शिनगारे यांनी ‘भाऊ, तुमचे तालुक्यात स्वागत. परंतु लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीतील माझी उधारी तेवढी अगोदर द्या. मग तुम्ही पुढील कार्यक्रमासाठी जावा. आधी आमचा निर्णय लावा. तुम्ही फोनही घेत नाही आणि घेतला तरी व्यवस्थितही बोलत नाही.’ असे शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांना सुनावले.या संबंधिचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 2014 पासून आतापर्यंत किती वेळ झाला ते तुम्ही मला सांगा असं तो हॉटेल मालक म्हणताना दिसत आहे. त्यावर सदाभाऊ त्या ठिकाणाहून निघून जात असल्याचं दिसत आहे.