अजित पवारांकडे रेड पडते त्यानंतरही शरद पवार आणि नरेंद्र मोदींचे अत्यंत मधुर संबंध राहतात कसे?

ठाणे – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राज ठाकरे नावाचं वादळ आता घोंगावू लागले असून विरोधक देखील  घायाळ चित्र आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची  ठाण्यात सभा झाली असून मागच्या सभेपेक्षा ही सभा जोरदार झाली.  गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत राज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर आज झालेल्या सभेत ठाण्यात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीची चांगलीच धुलाई केली.

राज ठाकरेंनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यामधून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं होतं. आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांवर त्यांनी तोंडसुख घेतलं. राज ठाकरे यांच्यावर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला यावेळी त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, सुप्रिया सुळे म्हणतात, लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटिशीने बदलतील याचं मला आश्चर्य वाटतं. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण तुमच्या घरी रेड पडत नाही याचं कारण मला कळेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रात एक माणूस पोहोचवला की पवार साहेब मोदींची भेट घेतात, पुढचा माणूस सांगायला. देशमुख गेले, मग परत एक भेट घेतली. अजितचं काय? मग रेड टाकल्या. त्यानंतर परत भेट घेतली, नवाब मलिक फाजीलपणा करतोय. मग नवाब मलिक. नंतर आता संजय राऊतांवर बोलले असं म्हणे. आत काय बोलले माहीत नाही. मी त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणात बोललो होतो की शरद पवार खूश झाले म्हणजे भीती वाटायला लागते. आज शरद पवार संजय राऊतांवर खूश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणारही नाही. यात अनेक काँग्रेसवाले गेलेत. मग उशिरा समजतं की तेव्हा ते बोलले होते, ते आज लागलंय.असं देखील ते म्हणाले.

अजित पवारांकडे रेड पडते. त्यांच्या सख्ख्या बहिणींकडे रेड पडते. त्यानंतरही शरद पवार आणि नरेंद्र मोदींचे अत्यंत मधुर संबंध राहतात. कसे? मी कधी बघितलं नाही शरद पवारांना भडकलेले. मी उघडपणे बोलत होतो, तेव्हा या सगळ्यांच्या शेपट्या आत होत्या.असा घणाघात त्यांनी केला.