इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची घरी कशी काळजी घ्यावी ?

मुंबई : इन्फ्ल्यूएंझा एच१एन१ आणि एच३एन२ टाईप-ए चे उपप्रकार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. यावर प्रभावी औषधी उपलब्ध आहे. सर्दी, ताप, खोकला होताच जवळच्या सरकारी किंवा खासगी दवाखान्यात त्वरीत दाखवून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. त्यामधील नमूद केलेली माहिती पुढीलप्रमाणे :

इन्फ्ल्यूएंझा टाळण्यासाठी हे करा
वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावेत.पौष्टिक आहार घ्यावा. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करा. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या, भरपूर पाणी प्यावे.

इन्फ्ल्यूएंझा टाळण्याकरता हे करू नका
हस्तांदोलन, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका. लक्षणे असतील, तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. वृध्द व दुर्धर आजारी लोकांनी गर्दीत जाणे टाळावे.

इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची घरगुती काळजी(How to take care of influenza patients at home?)
बहुतांश इन्फ्ल्यूएंझा रुग्ण सौम्य स्वरुपाचे असतात. त्यांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता पडत नाही. त्यामुळे अशा इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची घरी कशी काळजी घ्यावी, हे माहीत असणे आवश्यक आहे.रुग्णाकरीता वेगळी खोली निश्चित करावी. रुग्णाने शक्यतो कुटूंबियांशी संपर्क टाळावा.

रुग्णाने नाकावर साधा रुमाल बांधावा. रुग्णाची सेवा शक्यतो कुटुंबातील एकाच व्यक्तीने करावी.

रुग्णाने घरात जर कोणी अति जोखमीचे आजार असणारे असतील, तर त्यांच्या निकट सहवासात जाऊ नये. घरात ब्लिच द्रावण तयार करावे याचा उपयोग रुग्णाचा टेबल, खुर्ची, रुग्णाचा स्पर्श होतील, असे पृष्ठभाग पुसण्यासाठी करावा.

रुग्णाने वापरलेले टिश्यू पेपर अथवा मास्क इतस्ततः टाकू नयेत. रुग्णाने वापरलेले रुमाल गरम पाण्यात ब्लिच द्रावणात अर्धा तास भिजवून नंतर स्वच्छ धुवावेत. रुग्णाचे अंथरूण पांघरुण टॉवेल हाताळल्यास हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत. भरपूर विश्रांती घ्यावी आणि द्रव पदार्थ घ्यावेत.

डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. दिवसातून किमान दोन वेळा गरम पाण्यात मीठ- हळद टाकून गुळण्या कराव्यात तसेच गरम पाण्यात निलगिरी तेल टाकून त्याची वाफ घ्यावी. ताप आणि इन्फ्ल्यूएंझाची इतर लक्षणे मावळल्यानंतर किमान २४ तासापर्यंत घरी रहावे. धाप लागणे, श्वास घेताना छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, ताप न उतरणे अशी लक्षणे आढळल्यास तसेच लहान मुलांमध्ये चिडचिड करणे, खाण्यास नकार, उलट्या अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखविणे आवश्यक आहे.

अतिजोखमीच्या व्यक्ती
इन्फल्यूएंझा ए एच१एन१ आजार खालील अतिजोखमीच्या व्यक्तींमध्ये गंभीर स्वरूप धारण करु शकतो : पाच वर्षाखालील मुले (विशेष करून १ वर्षाखालील बालके), ६५ वर्षावरील वरिष्ठ नागरिक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा इतर हृदयरोग, मधुमेह, स्थूलत्व, फुप्फुस, यकृत, मूत्रपिंडाचे आजार (Heart disease, diabetes, obesity, lung, liver, kidney disease) असणाऱ्या व्यक्ती चेतासंस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्ती प्रतिकार शक्तीचा -हास झालेली व्यक्ती दीर्घकाळ स्टिरॉईड औषधे घेणाऱ्या व्यक्ती.