‘हदयी वसंत फुलताना…’ कार्यक्रमाद्वारे अशोक सराफ यांना अनोखी सांगीतिक मानवंदना

पुणे : प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Actor Ashok Saraf) हे आपल्या अभिनयासाठी ओळखले जातातच शिवाय त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी ही त्यांनी साकारलेल्या भूमिकांची एक वेगळीच छाप रसिकांच्या मनावर पाडतात. हेच लक्षात घेत अभिनेते अशोक सराफ यांच्यावर पडद्यावर चित्रित झालेली गाण्यांची सुरेल मैफली आयोजित करीत त्यांना अनोखी सांगीतिक मानवंदना देण्यात आली.

निमित्त होते रावेतकर ग्रुप व अभिव्यक्ती आयोजित ‘अशोकपर्व’ या महोत्सवात सादर झालेल्या ‘हदयी वसंत फुलताना…’ (Hrudayi Vasant Phultana) कार्यक्रमाचे. शनिवार (७ जानेवारी) रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात (Yashwantrao Chavan Theatre, Kothrud) सदर कार्यक्रम संपन्न झाला. अभिनेते विजय पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

अशोक सराफ व निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांबरोबरच कार्यक्रमाचे आयोजक व रावेतकर ग्रुपचे अजित रावेतकर, अभिव्यक्तीचे राजेश दामले, पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, नगरसेविका मंजुषा खर्डेकर आदी यावेळी उपस्थित होते.

१९८२ साली आलेल्या ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटातील ‘तूच माय बाप बंधू…’ या गीताने कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यानंतर ‘भले बुरे ते घडून गेले…’, १९७८ साली आलेल्या सुशीला चित्रपटातील ‘जीवन इसका नाम है प्यारे…’ आणि ‘कुण्या गावाचं आलं पाखरू…’ अशी एकाहून एक गीते सादर झाली.

१९७८ साली ‘दामाद’ या चित्रपटापासून नुकत्याच आलेल्या सिंघम या हिंदी चित्रपटापर्यंत व ‘हम पांच’ या मालिकेतील अशोक सराफ यांचा अभिनय आजही तितकाच नावीन्यपूर्ण आहे असे पटवर्धन यांनी नमूद केले. यानंतर ‘ राम दुलारी मैके गयी…’, ‘ मंगला ग मंगला…’, ‘नवी नवी नवरी…’ , नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील ‘निशाणा तुला दिसला ना..’, दीडशहाणे या चित्रपटातील ‘सांग कामिनी…’, ‘प्रियतम्मा…’, नाकावरच्या रागाला औषध काय..?’, आदी गीतेही सादर झाले. पुणेकर रसिकांनी टाळया शिट्ट्यांच्या वर्षावात कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. ‘हदयी वसंत फुलताना…’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

योगिता गोडबोले – पाठक, जितेंद्र अभ्यंकर, राधिका अत्रे, जितेंद्र भुरुक, राहुल जोशी यांनी सर्व गीतांचे सादरीकरण केले. त्यांना मंदार देव, मिहिर भडकमकर, विशाल थेलकर, केदार मोरे, अभिजित भधे आणि नितीन शिंदे यांनी समर्पक साथसंगत केली.